Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

श्री स्वामी समर्थांचं असं रूप तुम्ही कधी पाहिलं आहे का?

चिमुकला म्हणतोय “अहो स्वामी तुम्ही आहात ना? मग भिऊ कशाला…..”

श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच स्वामींची धीर-गंभीर पण स्थिर अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते आणि त्याच वेळेला कानात गुंजू लागतात स्वामी समर्थांवरील लहानपणापासून ऐकलेल्या गीतांचे स्वर. त्यातही शक्यतो एका विशिष्ट शैलीत संगीतबद्ध केलेली व पारांपरिक वाद्यांचा वापर केलेली गाणीच स्मरतात. परंतू जर तुम्हाला कोणी सांगितलं की स्वामी समर्थांवर एका ७ वर्षांच्या चिमुकल्याने चक्क गाणं गायलंय आणि ज्यात स्वामी त्या मुलाशी हसत-बागडत खेळत आहेत तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण अस घडलंय जरूर. मुंबईत राहणार्‍या सात वर्षीय सुराध्य देसाई याने ‘अहो स्वामी तुम्ही आहात ना….’ या गाण्याच्या माध्यमातून आपल्या गोड गळ्याने त्याच्या आवडत्या स्वामी समर्थांना मनापासून साद घातली आहे. संगीतकार दिपेश याने स्वतः शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध झाला असून अल्पावधीत हे गाणं लहान-मोठ्यांच्या ओठांवर रुळूही लागलं आहे. उदय साळवी यांनी या गाण्याचे संगीत संयोजन केले आहे.

या सुमधुर गाण्यासोबतच याचा व्हिडिओही तितकाच अप्रतिम असून लेखक-दिग्दर्शक श्याम अधटराव यांचे दिग्दर्शन याला लाभले आहे. यात स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद धनू यांनी स्वामींची वटवलेली भूमिका अगदीच चपखल असून स्वतः प्रत्यक्ष स्वामीच सुराध्य बरोबर खेळत असल्याचा भास होतो. स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी अरविंद धनू यांनी घेतलेल्या परिश्रमाचं चीज झालं असं म्हणणं वावगं ठरू नये. मागील दीड-दोन वर्ष सबंध जग जागतिक महामारीमुळे पुर्णपणे गोठलं असून घरात बसून-बसून लहान मुलंही पार मेटाकुटीस आली आहेत. याच पार्श्वभूमीवर एकटा पडलेला चिमुकला सुराध्य या गाण्यात स्वामींबरोबर कधी पकडा-पकडी तर कधी सापशिडी खेळताना दिसतोय. श्री स्वामी समर्थांवरील अशा प्रकारचं हे पहिलंच गाणं आहे ज्यात ते एका लहानग्यासोबत बागडताना दिसत आहेत. या गाण्या बाबत बोलताना संगीतकार दिपेश म्हणाले की, “सध्या हे गाणं लहान मुलांना खूप आवडत आहे. अगदी छोट्या चिमुरड्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत. काही मुलं तर अगदी आई बाबांकडे हट्ट करतात की स्वामी आजोबांचे गाणं लावा…तर काहींच्या बाल मनाला प्रश्न पडतो की हे स्वामी आजोबा म्हणजे नक्की कोण? याच निमित्ताने निदान लहान मुलांच्या मुखी स्वामींचे नाम सदैव येत राहतंय याचं जास्त समाधान आहे.” हे गाणं सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे इतकं नक्की….

गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा शिवाय चिमुकल्या सुराध्य च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *