आता बेस्ट बसेसमध्येही युनिव्हर्सल पास बंधनकारक
मुंबई, दि.३०: उपरावर्तित कोरोना विषाणू ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर, गेल्या १० दिवसांपूर्वी परदेशातून विमानानं मुंबईत आलेल्या सुमारे एक हजार प्रवाशांचा शोध मुंबई महापालिकेकडून सुरु आहे. त्यापैकी मुंबईत किती नागरिक आहेत त्याचा शोध घेतला जात असून त्यांना विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. याबाबत आदित्य ठाकरे यांनी आज पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राज्य सरकारनेही नियमावली जाहीर केली असून कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच एसटी, बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी या वाहनांनी प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या नवीन नियमावलीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये युनिव्हर्सल पासची तपासणी होते, त्याच प्रमाणे बेस्ट बसेसमध्येही दोन मात्रा घेतलेल्यांच्या युनिव्हर्सल पासची तपासणी केली जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
Source-AIR
