पर्यावरण जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यातील तरुणांचा उरण ते गोवा सायकल प्रवास
उरण, दि.२०(विठ्ठल ममताबादे): जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरणमधील विवेक मेघश्याम भगत व रोहा तालुक्यातील सूरज शरद खांडेकर हे दोन तरुण उरण ते गोवा असा ६५० किलोमीटर सायकलवरून प्रवास करत आहेत. त्यानुसार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी उरण चारफाटा येथून प्रस्थान केले आहे. एकूण ६ दिवसांचा हा प्रवास असून २३ तारखेला ते गोव्याला पोहोचतील. जमले तर गोव्या पुढेही काही किलोमीटर सायकल वरून प्रवास करत दक्षिण भारता मध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, प्लास्टिकची समस्या यामुळे प्रदूषण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे सायकलस्वार विवेक भगत, सूरज खांडेकर यांनी सांगितले. या उल्लेखनीय उपक्रमासाठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील व उरण सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
