शिवा संघटनेच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
मुंबई, दि.११(विठ्ठल ममताबादे): श्रीक्षेत्र भक्तीस्थळ ते तिर्थक्षेत्र कपिलधार मार्गास श्री मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग असे नामकरण करण्यात यावे. मांजरसुंबा ते कपिलधार ५ किमी घाटरस्ता ओव्हर ब्रीज बांधुन त्यास महामार्गास जोडावा. श्रीक्षेत्र भक्तीस्थळास तिर्थक्षेत्र ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा द्यावा. ओबीसीनां स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुर्ववत आरक्षण देणे. कोरोना काळात किर्तनकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे वीरशैव सांप्रदायातील किर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक यांनाही सदर योजना लागु करुन ५,००० रुपये मानधन द्यावे आदी विविध मागण्यांबाबत शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष वीरशैव-लिंगायत ह्रदयसम्राट प्रा. मनोहरजी धोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे नगरविकास व सा.बां. मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व मागण्या मान्य करण्यात यावे याबाबत निवेदन दिले आहे. या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित मंत्री महोदयांनी दिले आहे.
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुर्ववत आरक्षण देणे याबाबत या मुद्द्यावर मा. सर्वोच्च न्यायालयातील ईम्पिरिकल डाटा मिळणे बाबतची याचिका, केंद्र सरकार कडुन ईम्पिरिकल डाटा मिळविणे व राज्य मागासवर्गीय आयोगाकडुन ईम्पिरिकल डाटा जमा करणे अशा तीनही आघाड्यांवर राज्य सरकार चे काम युध्द पातळीवर चालु असुन ओबीसींना लवकरच आरक्षण दिले जाईल असे स्पष्ट आश्वासन शिवा संघटनेच्या शिष्टमंडळाला अजित पवार यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेत शिवा संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवा संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष शिवा बीराजदार, रायगड जिल्हाध्यक्ष विनायक म्हमाने, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव गुजर, पनवेल शहराध्यक्ष दत्ता पाटिल, ठाणे शहराध्यक्ष मल्लिकार्जुन डब्बे, प्रसाद महाजन, मनोज डोंगरे, सुनील लाठे, बसवेश्वर धोंडे आदि शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
