चीनला अमेरिकेचा गर्भित इशारा
दक्षिण चिनी समुद्रावरच्या हक्काबाबत आंतरराष्ट्रीय लवादानं दिलेल्या निकालाला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिका यांच्यात काल शाब्दिक युद्ध रंगलं. या लवादानं 2016 मध्ये फिलिपिन्सच्या बाजूनं निकाल देताना दक्षिण चिनी समुद्रावरचा चीनचा हक्क नाकारला होता. मात्र, हा निकाल म्हणजे केवळ कागदाचा एक तुकडा असून अमेरिकेच्या दडपणाखाली चीनला खिजवण्याचा झालेला प्रयत्न आहे, अशा शब्दांत चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या कराराची हेटाळणी केली आहे.
समुद्रावरचा चीनचा हक्क नाकारताना अमेरिकेतल्या बायडेन प्रशासनानं माजी अध्यक्ष ट्रम्प यांचं धोरण कायम ठेवलं आहे. तसंच, चीनने फिलिपिन्सवर हल्ला केल्यास अमेरिकेकडून प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काल दिला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण चिनी समुद्रात प्रवेश केलेल्या अमेरिकेच्या एका विनाशिकेला पळवून लावल्याचा दावा चीननं केला आहे.
