सेनाभवनासमोरच सोनिया सेना म्हणत शिवसेनेची हेटाळणी; प्रत्युत्तरादाखल शिवसैनिकांचा राडा
मुंबई, दि.१६: शिवसेनेने राममंदिरा संदर्भात भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. या टीकेच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा तर्फे ‘फटकार मोर्चा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधी घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी शिवसेनेची सोनिया सेना अशी हेटाळणी करणारे फलकही झळकावले.
नेमकं या मोर्चाच्या ठिकाणी हळूहळू शिवसैनिक जमा व्हायला लागले. स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव हेही तिथे आले. यावेळी शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शिवसैनिकांनी भाजप च्या कार्यकर्त्यांची यथेच्छ धुलाई केलेली पाहायला मिळाली. पोलिसांनी यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. अखेर भाजयुमो च्या ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या साऱ्या गोंधळात परिसरात झालेल्या ट्राफिक जॅम ने सामान्य मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.
