कोविड- १९ वरील उपचारांमधून प्लाझ्मा उपचार पद्धती वगळला; तज्ञ डॉक्टरांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना केली होती शिफारस
कोविड-१९ वरच्या उपचारांसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या कार्यपद्धतीमधून प्लाझ्मा उपचार आता वगळण्यात आले आहेत. कोविड-१९ च्या सौम्य, मध्यम आणि गंभीर स्थितीवर उपचारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व काल राष्ट्रीय कोविड कृती दलाने जाहिर केली, त्यात प्लाझ्मा उपचारांचा उल्लेख नाही.
कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातल्या विषाणू प्रतिकारक पेशी, दुसऱ्या रुग्णावर उपचारांसाठी वापरण्याचा हा मार्ग कोविडची साथ फैलावत असताना सुरुवातीला अनेकदा स्वीकारला होता. मात्र त्याचा उपयोग होत नाही असं मत तज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केलं होतं.
प्लाझ्मा उपचारांचा सकारात्मक परिणाम कोणत्याही बाजूने आढळत नाही त्यामुळे ही उपचारपद्धत विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर उतरत नाही. तेव्हा सरकारच्या अधिकृत कार्यपद्धतीतून ती वगळावी अशी शिफारस करणारं पत्र तज्ञ डॉक्टरांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांना लिहीलं होतं. अखेर केंद्र सरकारने या शिफारशींवर अंमलबजावणी करत कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वगळली.
