लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने सी.ए.च्या परीक्षा पुढे ढकलल्या
लोकसभा निवडणुकांमुळे सीएची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ही परीक्षा अगोदर २ ते १७ मे दरम्यान होणार होती. मात्र, आता ही परीक्षा २७ मे ते १२ जून या कालावधीत होणार आहे. यासाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असेही ‘मुंबई विद्यापीठाने’ म्हटले आहे.
विद्यापीठाच्या परिक्षेत्रात पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत व सिल्वासा तर दुसर्या टप्प्यात २९ एप्रिल २०१९ रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. परिणामी, पहिल्या टप्प्यात २२,२३ व २४ एप्रिल २०१९ असे तीन दिवस तर दुसर्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल २०१९ असे एकूण पाच दिवसांचे विविध परीक्षांचे पेपर व काही परीक्षा विद्यापीठ पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
अनेक महाविद्यालये पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीची केंद्रे असून, एक दिवस अगोदरच ती निवडणूक कर्मचार्यांच्या ताब्यात जातील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही निवडणूक कामावर असतील. त्यामुळे परीक्षेच्या दुसर्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल २०१९ व ३० एप्रिल २०१९ या दिवशी परीक्षेचे पेपर न ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
