उरण ते डी वाय पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई मोफत प्रवासामुळे रुग्णांमध्ये, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
उरण दि. ४(विठ्ठल ममताबादे): नेरुळ, नवी मुंबई येथील प्रसिद्ध डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी उरण मधील नागरिकांना प्रवास करणे सोपे व्हावे, हॉस्पिटल मध्ये वेळेत जाता यावे व परत उरण मध्ये वेळेत येता यावे या दृष्टीकोनातून गेली १३ वर्षांपासून उलवे येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड उर्फ अण्णा यांनी आपले स्वतःचे वाहन नागरिकांच्या सेवेत अर्पण केले आहे.
या वाहनातून आजारी रुग्ण तसेच विविध तपासणी करण्यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला जाणाऱ्या नागरिकांना पेन्शनर्स पार्क उरण शहर येथून दररोज सकाळी ९ वाजता वाहनातून नेले जाते व दुपारी २ वाजता परत त्या रुग्णांना, नागरिकांना उरण मध्ये आणून सोडले जाते.
विशेष म्हणजे ही सेवा सर्व नागरिकांसाठी, रुग्णांसाठी मोफत आहे. कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आली होती मात्र आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा खुद्द या वाहनाचे चालक-मालक श्री. डेव्हिड यांनी दिली.
कोविड-१९ मध्ये बंद झालेली डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे जाणारी गाडी परत चालू झाली आहे. ही गाडी रोज सकाळी ९ वाजता पेन्शनर्स पार्क, एन.एम.एम.टि. बस डेपो, उरण शहर येथून जाणार आहे व परत दुपारी २ वाजता डी. वाय. हॉस्पिटल, नेरुळ येथून उरणला येण्यासाठी निघणार आहे.
ही सेवा सर्व नागरिकांसाठी मोफत असून दररोज चालू राहणार आहे. ज्या रुग्णांना अथवा नागरिकांना या वाहनातून प्रवास करायचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी 9870379660, 9920321676 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
