कुंभमेळ्यात सहभागी होत आहात? मग या मार्गदर्शक सूचना वाचा
कोविड १९ साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मेळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी उत्तराखंड सरकारकडे आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय किंवा सामाजिक आरोग्य केंद्र यांच्याकडून वैदयकीय प्रमाणपत्र घेतलेले असणेही आवश्यक आहे. यावर्षी कुंभ मेळ्याचा कालावधी ४८ दिवसांचा असून, यंदा नेहमी असणारा साडेतीन महिन्यांचा कालावधी कमी करण्यात आला आहे.
हरिद्वार रेल्वे स्थानकावर भाविकांसाठी सोयी सुविधा सज्ज करण्यात आल्या असून, अनेक खास रेल्वेगाड्याही सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रसरकारने निम लष्करी दलाच्या ४० तुकड्या तैनात केल्या असून, सीमासुरक्षा दल, भारत तिबेट सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य सुरक्षा दल यांच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार कमांडो पथक, बॉम्ब शोधक दल, स्नायपर्सही तैनात करण्यात येणार आहेत.
