कोणाच्या आशिर्वादाने चालू आहेत हे प्रकार?
नवी मुंबई, २१: बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्स अशा सार्वजनिक ठिकाणी दारू विक्रीस परवानगी नसताना दारू विक्रीसोबतच खुलेआम दारू सेवनाचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानक कॉम्प्लेक्स मध्ये समोर आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम कडे काही दिवसांपूर्वी तक्रार आली होती. परंतू याकाळात जवळपास सारेच जग थांबले होते त्यामुळे आम्हाला सदर प्रकार पोलीस व सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणता आले नाही. नुकतीच महाराष्ट्र वार्ता च्या टीम ने या ठिकाणी भेट देत हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
व्हिडिओ पहा:
जेव्हा आमची टीम येथे पोहोचली तेव्हा या दारूच्या दुकानावर अपेक्षेप्रमाणे शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राजहंस वाईन्स नामक या वाईन शॉप ला लागूनच प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडण्याच्या मार्गावर अनेक मद्यप्रेमी चक्क उघड्यावर पाणी व शितपेयांच्या बाटल्यांत तन-मन-धन लावून ‘रेडिमिक्स’ चे ‘प्रयोग’ करताना दिसले.

यानंतर तिथेच उघड्यावर आजूबाजूला लहान मुलं व स्त्रियांचा वावर असूनही मद्याचे जाम रिचवण्याचा गंभीर प्रकार कायद्याला पायदळी तुडवून खुलेआम चालू होता. शिवाय हे इथले नेहमीचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे हा सर्व प्रकार नेरुळ रेल्वे स्थानक कॉम्प्लेक्स मध्ये ड्युटीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक(सु.र.मं.) मंडळ च्या सुरक्षा रक्षकांसमोर बिनदिक्कत चालू असतो. त्यांच्याकडून या बाबत काय कारवाई झाली हे समोर येणे गरजेचे आहे.

मुळात गेल्या काही वर्षांत सिडको ने बांधलेल्या या संकुलात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या अनेक व्यवसाय चालू असल्याचे सांगितले जाते. २१ व्या शतकातील शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबई सारख्या शहरातील हे सर्वात जास्त बकाल रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य असून, गर्दुल्ले व भिकाऱ्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यात खुलेआम दारूसेवनाच्या प्रकारामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे सर्व कोणाच्या आशिर्वादाने चालू आहे हे आता उघड होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारांबाबत पोलिसांची भूमिकाही काहीशी मूळमुळीत दिसते. पण हे सर्व प्रकार कायमचे बंद करण्यासाठी नेरुळकरांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासन, आतातरी या प्रकरणी या वाईन शॉपवर व येथे खुल्यावर दारू सेवन करणार्यांवर कठोर कारवाई करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
आपल्या शहरात-गावात असेच प्रकार चालू असतील तर आम्हाला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 वर व्हाट्सअप् द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता. आम्ही नक्कीच यंत्रणांच्या निदर्शनास असे प्रकार आणू.
लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
