अमेरिकेत फायझरद्वारे निर्मित कोविड-१९ वरील लसीला मान्यता देण्याची तज्ञांची शिफारस
फायझर या औषध कंपनीच्या कोविड-१९ वरील लसीला अधिकृत स्वीकृती देण्यासाठी अमेरिकेतल्या तज्ञांच्या एका गटाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे औपचारिकरित्या शिफारस केली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत अमेरिकेत फायझर लसीला मंजूरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील आठवड्याच्या सुरूवातीला आरोग्य सेवा कर्मचारी आणि नर्सिंग होममधील रहिवाशांना प्राधान्याने लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
या लसीबाबत शिफारस करण्यात आलेल्या समितीत तज्ञ सल्लागार, वैज्ञानिक विशेष तज्ञ, संक्रामक रोग चिकित्सक आणि संख्याशास्त्रज्ञ यांचा समावेश असून त्यापैकी या लशीच्या बाजूने १७ तर विरोधात ४ मते पडली तर एक सदस्य अनुपस्थित राहिला होता.
१६ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकाना ही लस दिली जाणार आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनावर सल्लागार समितीचा सल्ला पाळण्याचे बंधन नाही.
