मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान
मराठवाड्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं मराठवाड्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीत पिकांचं मोठं नुकसान झालं असल्यानं नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिले. त्यांनी आज जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या हिवरा, काठोडा या गावातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तसंच अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली.
नांदेड जिल्ह्यातही नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुखेडचे माजी आमदार हणमंत बेटमोगरेकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. उदगीर तालुक्यातल्या नागलगाव, सुमठाण, धडकनाळ इथल्या बाधित पिकांची काल बनसोडे यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात वडीगोद्री महसूल मंडळात परवा रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं मांगणी नदीला पूर आला आहे. नदीलगतच्या ऊस, कापूस, सोयाबीनच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहागड इथला कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ८२९ हेक्टोर क्षेत्रावरील शेती या पावसाच्या तडाख्यानं भुईसपाट झाली आहे. सर्वाधिक नुकसान चांदवड तालुक्यात झालं असून याठिकाणी ३३ हेक्टपर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यापाठोपाठ येवला तालुक्यात २१ हेक्ट्र क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या वतीनं या संदर्भात पंचनामे करण्यात येत आहेत सप्टेंबर महिन्यातील या पावसामुळे भात पिकासह डाळिंब, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, मका, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन कांदा, उडीद, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
