राज्यातले वैविध्यपूर्ण पर्यटन जगात सर्वत्र पोहचवून राज्याला पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.२७: राज्यातलं वैविध्यपूर्ण पर्यटन जगात सर्वत्र पोहचवून राज्याला पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. पर्यटन विकास महामंडळानं नाशिकच्या गंगापूर धरणाजवळ बांधलेल्या ग्रेप रिसॉर्ट आणि बोट क्लबचे तसंच खारघर इथल्या एमटीडीसी रेसिडन्सी या पर्यटक संकुलाचं उद्धाटन आज ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातल्या विविध पर्यटनस्थळं, तिर्थक्षेत्रं, वारसास्थळं तसंच पर्यटनाशी संबंधित सोयीसुविधांची संपूर्ण माहिती देणा-या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते झालं.
मुंबईत वर्षा बंगल्यात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आधिकारी उपस्थित होते तर छगन भुजबळ आणि अदिती तटकरे हे मंत्री ऑनलाईन सहभागी झाले होते.
राज्यातल्या पर्यटनस्थळांचा फक्त विकास करुन चालणार नाही, तर तिथं कसं पोचायचं, भेट देण्याचा योग्य काळ आदीविषयी तपशिलवार माहिती आणि सोयी-सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील, असं ते म्हणाले.
