देशातल्या विविध बंदरांमधे अडकलेल्या कांदा निर्यातीला पियुष गोयल यांची अखेर परवानगी
नवी दिल्ली, दि.१९: देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी परवानगी दिली आहे. केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन कांदा सीमेवर तसंच बंदरांमधे अडकून पडला होता. अजून काही काळ तसाच राहिला असता, तर तो सडून शेतक-यांचं आणि व्यापा-यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असतं.
गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीसह इतर विरोधीपक्षांनी कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी चालू होती. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांकडून रस्त्यावर उतरत आंदोलन चालू होतं. पण वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सध्यातरी देशभरातील बंदरांमध्ये अडकलेला कांदा निर्यात करण्याची निर्यातदारांची मागणी मान्य केली.
