थॉमस कप आणि उबेर कप स्पर्धा जागतिक बॅडमिंटन महासंघानं पुढे ढकलल्या
थॉमस चषक आणि उबेर चषक या बॅडमिंटन विश्वातल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा, जागतिक बॅडमिंटन महासंघानं पुढे ढकलल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार डेन्मार्कमध्ये येत्या ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार असलेल्या या स्पर्धा, आता पुढच्या वर्षी होतील, मात्र निश्चित वेळापत्रक आणि स्पर्धेचं ठिकाणही पुढच्या वर्षीच घोषित करु, असं महासंघानं आज एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.
थॉमस चषक ही पुरुषांची, तर उबेर चषक ही महिलांची, सर्वोच्च जागतिक सांघिक बॅडमिंटन स्पर्धा असून ती नेहमी एकत्र खेळवली जाते. जागतिक कोविड साथीमुळे, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई म्हणजेच तैवान, ऑस्ट्रेलिया आणि अल्जेरिया या सहा देशांच्या संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर, महासंघानं आपत्कालीन बैठक बोलावली.
या बैठकीत सर्वप्रथम, आहे त्याच वेळापत्रकानुसार, फक्त ठिकाण बदलण्याच्या पर्यायावर विचार होऊन, हॉंगकॉंग आणि सिंगापूर कडे यजमानपद स्वीकारण्याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर संघ माघार घेत असल्यामुळे, तसच चीन आणि जपान या बॅडमिंटन महासत्तांचा सहभागही अनिश्चित असल्यामुळे, स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
भारतानं थॉमस चषकासाठी किदंबी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली, तर उबेर चषकासाठी पी. व्ही. सिंधू च्या नेतृत्वाखाली सायना नेहवाल सह, प्रत्येकी दहा सदस्यांचे संघ निवडले होते.
