आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाल्या ३ अद्ययावत रुग्णवाहिका
नवी मुंबई दि. २०: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना या कोरोना विरोधातील लढ्याला विविध संस्था, व्यक्ती यांच्या मार्फतही बळ दिले जात असून बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्फत आमदारांच्या विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी तीन अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
आज महापालिका मुख्यालय इमारतीसमोर या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार मंदा म्हात्रे व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे माजी नगरसेवक रामचंद्र घरत, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, संपत शेवाळे, सुनील पाटील, दीपक पवार, भरत जाधव आणि इतर महापालिका अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना विरोधातील लढाईत महापालिका प्रशासनाप्रमाणेच लोकप्रतिनिधी, विविध संस्था नागरिकही आपला सहभाग देत असताना आवश्यक रुग्णालयीन सुविधांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी एक कोटी रक्कमेचा आमदार निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. त्यामधील साधारणतः ५० लाखांच्या निधीतून सर्व सुविधांनी युक्त अशा तीन रुग्णवाहिका आज नागरिकांच्या सेवेत दाखल होत असून नागरिकांना वेळेत उपचार व्हावेत याकरिता या रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील असे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीमध्ये ज्या सुविधांची आत्यंतिक गरज आहे त्यामध्ये रुग्णवाहिका ही महत्त्वाची गरज असून आमदार मंदा म्हात्रे यांनी ऑक्सिजन सुविधा व मॉनिटर्स सुसज्ज अशा तीन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला योग्य सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या रुग्णवाहिकांचा कोविड व्यवस्थापनात चांगला उपयोग होऊन अशा होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत आज ज्या रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत त्या अनुक्रमे वाशी येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ येथील माता व बाल रुग्णालय व बेलापूर येथील सार्वजनिक रुग्णालयात सेवेसाठी सज्ज असणार आहेत.
