निवडणूक काळात ‘ड्राय डे’, उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल
मुंबई: यंदाची लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सरकारने नवीन धोरण आखण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी देशी, विदेशी दारू अथवा ताडीसारखे मद्य पदार्थ यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
१९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १३५ (सी) नुसार ही मनाई करण्यात आली आहे. निवडणुक व मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
यंदा राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघांमध्ये एकूण ४ टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रिल २०१९ रोजी ७ मतदारसंघासाठी, १८ एप्रिल रोजी १० मतदारसंघासाठी, २३ एप्रिल रोजी १४ मतदारसंघासाठी आणि २९ एप्रिल रोजी १७ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे.
