…..जिना यांचे देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासात महत्वाचे योगदान : शत्रुघ्न सिन्हा
छिंदवाडा : काही दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते आणि त्याच प्रेरणेने मी या पक्षात आलो आहे, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
छिंदवाडा येथे बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानची निर्मिती करणारे मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं योगदान खूप मोठे असल्यामुळेच मी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये आलोय ते पहिलं आणि शेवटचं. मी मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.
देशातील सुखी जनतेला कुठल्याच प्रकारची कल्पना न देता एकट्या मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.
काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेस पक्षाने पाटणा-साहिब येथून उमेदवारी दिली. त्यामुळे पाटणा-साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे.
