‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या जोडीला देशात पुन्हा स्थान देणार नाही असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज आपल्या आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
देशात भाजप सोडून जो कोणता पक्ष बहुसंख्य मतांनी निवडून येईल त्या पक्षाला आमचा जाहीर पाठिंबा असेल असे, मत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मांडले आहे.
दिल्ली लवकरच पूर्ण राज्य होणार. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळताच दिल्लीत पोलिस भरती परीक्षा घेण्यात येईल. असे आम आदमी पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात सांगितले आहे. जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमा दरम्यान बोलताना केजरीवालांनी भाजप सरकारवर तोफ डागली. २०१९ ची लोकसभा निवडणूक भारताच्या इतिहासात महत्वाची ठरेल. देशात लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
भारतामध्ये यापूर्वीदेखील अनेक हल्ले झाले पण सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र होते. मात्र आता आपली संस्कृती संकटात आहे. संस्कृतीला वाचवण्याची गरज आहे. भाजपसोडून जो कोणता पक्ष सत्तेवर येण्याच्या मार्गावर असेल त्या पक्षास आमचा पाठिंबा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
