मुंबईतील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. १०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत अशा या दोन गाड्या आहेत. तसेच, मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या दोन रस्ते प्रकल्पांमुळे मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८वर आल्यानंतर पंतप्रधानांनी मुंबई-साईनगर वंदे भारत रेल्वेगाडीचे अवलोकन केले. तसेच, गाडीतील कर्मचारी वर्ग आणि मुलांशीही त्यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वेसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील प्रगत दळणवळण व्यवस्थेसाठी हा एक मोठा दिवस आहे कारण एकाच दिवशी दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वंदे भारत रेल्वेगाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे, कॉलेजला येणारे, नोकरी आणि व्यवसायासाठी येणारे लोक, शेतकरी आणि भाविक सर्वांना यामुळे सुविधा मिळणार आहेत असे पंतप्रधान म्हणाले. शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी सारख्या तीर्थक्षेत्रांना जाणे यामुळे सोयीचे होणार आहे. ह्या गाड्या पर्यटन आणि तीर्थयात्रा दोन्हीला चालना देतील असे त्यांनी सांगितले. “मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्री जाणे आता खूप सुलभ होणार आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताचे अत्यंत शानदार चित्र आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “ह्या गाड्या भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब आहे.” वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या वेगाविषयी ते म्हणाले, की आतापर्यंत अशा १० गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. देशातल्या १७ राज्यांत १०८ जिल्ह्यांमधून ह्या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमुळे सर्वसामान्य व्यक्तींचे आयुष्य सुखकर होईल, याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडली जातील, असे सांगत कुरार बोगदाही वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
२१व्या शतकातील भारतासाठी नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुलभ करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सुधारणांच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आधुनिक गाड्या, मेट्रोचा विस्तार तसेच नवीन विमानतळ आणि बंदरे सुरू करण्यामागे हीच विचारसरणी आहे, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीला अर्थसंकल्पाने बळ दिले आहे कारण पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेचा वाटा २.५ लाख कोटी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या रेल्वे अर्थसंकल्पातही अभूतपूर्व वाढ केली आहे आणि दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा वेगाने पुढे जाईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बळकटी मिळाली आहे, पगारदार आणि व्यावसायिक या दोघांच्याही गरजा या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. २०१४ पूर्वी २ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांवर कर आकारला जात होता, परंतु सध्याच्या सरकारनेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात करआकारणीसाठी सुरुवातीला ५ लाख रुपये आणि आता ७ लाख रुपये अशी उत्पन्न मर्यादा केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांनी २० % कर भरला ते आज शून्य कर भरतात, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. नवीन नोकऱ्या असलेल्यांना आता अधिक बचत करण्याची संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
‘सबका विकास सबका प्रयास’ या भावनेला चालना देणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक कुटुंबाला बळ देईल आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि कपिल मोरेश्वर पाटील आणि राज्य सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.
