उरण तालुक्यातील खोपटे जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी
उरण, दि. ९(विठ्ठल ममताबादे): खोपटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोपटे मधील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची जुनी इमारत तोडून जवळजवळ एक वर्ष होत आला आहे. त्या जागेवर त्वरित शाळेची नवीन इमारत होणे अपेक्षित होते मात्र त्या जागेवर अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. सदर प्राथमिक शाळेची ईमारत सी एस आर फंडांतून दुबई पोर्ट (एन.एस.आय.सी.टी) नामक कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात येणार असल्याची प्राथमिक चर्चा ग्रामपंचायत आणि शालेय शिक्षण कमिटीच्या चर्चासत्रात झाली होते. मात्र अजूनही प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम सुरू झाले नाही. महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार लवकरच शाळा सुरू होणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आणि शिक्षकांना शिकवण्यासाठी वर्ग तर पाहिजेत. त्यामुळे महत्वाची गरज ओळखून खोपटे गावचे ग्रामस्थ आणि विद्यमान ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर ग्रा. पं. सदस्या जागृती घरत, ग्रा. पं. सदस्या, भावना पाटील, ग्रा. पं. सदस्या, राजश्री पाटील ग्रा. पं. सदस्या, करिष्मा म्हात्रे ग्रा.पं. सदस्या, शुभांगी ठाकूर ग्रा. पं. सदस्यांनी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी उरण, सभापती उरण पंचायत समिती, निलम गाडे – गटविकास अधिकारी उरण यांच्याकडे लेखी अर्ज देऊन प्राथमिक शाळा खोपटे ह्या शाळेच्या इमारतीचे लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी केली आहे. शाळा सुरु झाल्यास मुलांना कुठे बसविणार? शिक्षक विद्यार्थ्यांना कसे शिकविणार? विद्यार्थी किती दिवस पर्यायी जागेत शिकतील? हा मोठा प्रश्न असून शाळेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याने लवकरात लवकर शाळेचा प्रश्न निकाली काढावा अशी लेखी मागणी पत्रव्यवहाराद्वारे विविध संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती उपसरपंच सुजित म्हात्रे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सध्या ४ वर्गांची पर्यायी व्यवस्था तिथेच बाजूला केलेली आहे. जोपर्यंत शाळेच्या नवीन इमारतचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थी या ४ रूम मध्ये शिकणार आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण चालूच राहील. शाळेचे नवीन इमारत साठी प्रयत्न चालू आहेत.
– नीलम गाडे
गटविकास अधिकारी,
पंचायत समिती.
