चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत; कोकणवासियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच हे शासन खंबीरपणे कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
– कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
नुकसानभरपाईच्या निकषातील बदलांमुळे भरीव मदत
– मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेच तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सुचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.
बदललेल्या निकषामुळे मदतीत दीड ते ३ पट वाढ
· पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १ लाख ५० हजार इतकी वाढवण्यात आली आहे.
· बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाई साठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती आता ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल
· अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
· कच्च्याघराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
· नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.
· गावात लहान मोठी दुकाने, टपरी चे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
· ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रती कुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे.
वीजपुरवठा सुरळित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
– चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरी मध्ये वीजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी इतर जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त करण्यात आले आहे. येथील वीजपुरवठा सुरळित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पुरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी पुराने नुकसान झालेल्या पुरग्रस्तांचे पैसे तातडीने देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मदत पुनर्वसन विभाग यासंदर्भातील प्रस्ताव पाठवत असल्याचे ते म्हणाले. कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्या मार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. निसर्गवादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळित होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांना रेशनदुकानातून तांदुळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
