अतिवृष्टीनं सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
सोलापूर, दि.१९: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी, सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगून, मदतीचं आश्वासन दिलं.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्यात रामपूर इथं दहा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशाचं वाटप करण्यात आलं.
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज तुळजापूर इथं बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. प्रशासनानं जिल्ह्यातल्या विमा संरक्षणाखालील येणाऱ्या शेतकऱ्यांचा यादी करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत शासनाकडून नक्की केली जाणार असल्याचं सांगत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.
कापणी होऊन पाण्यात गेलेल पीक, शेतात पाण्यात असलेल पीक आणि वाहून गेलेल्या भातपिकाचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी आज खारेपाटण इथं शेतात उतरून भातपीक नुकसानीची पाहणी केली. गेल्यावर्षी भातशेती नुकसानीचे पंचनामे शेतात येऊन नाही तर मंदिरात बसून केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी यावेळी केली.
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात पाली, कळमखांड, ऐनशेत या गावांना कोकण विभागाचे विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील यांनी भेट दिली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली आणि पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
