फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय कुणा एका समुदायाच्या विरोधात नाही, सर्वोच्च न्यायालयाची भुमिका
नवी दिल्ली: देशात फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय कुणा एका समुदायाच्या विरोधात नाही, केवळ आनंदासाठी नागरीकांच्या हक्कांची पायमल्ली करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
फटाक्यांसंबंधी न्यायालयाच्या दोन आदेशांची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं, न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठानं सांगितलं. आनंदासाठी उत्पादक हे सामान्य लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असं सांगताना न्यायालयानं, सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली नसल्याचं नमूद केलं.
न्यायालयीन आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सहा उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावत या सर्वांना शिक्षा का करु नये, असा सवाल केला आहे. सध्या केवळ हरीत फटाक्यांनाच परवानगी असून, फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
Source – AIR
