शिक्षण विभागाकडून संपर्क करण्याचे आवाहन
मुंबई, दि.४: इयत्ता दहावीच्या सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थी-निहाय गुणांची नोंद करताना काही शाळांकडून काही त्रुटी आणि चुका झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.ज्या शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या असतील त्यांनी पाच ते नऊ जुलै दरम्यान संबंधित विभागीय मंडळांशी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या संगणक प्रणालीमध्ये निश्चित केलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे गुण न भरले जाणं, भरलेले गुण निश्चित न करणं, निश्चित केलेल्या गुणातही काही त्रुटी राहणं, विद्यार्थ्यांच्या एखाद्या विषयाचे गुण न भरले जाणं, इयत्ता पाचवी ते नववीची टक्केवारी न भरली जाणं, उशिरा आवेदनपत्र भरल्यामुळे संगणकीय प्रणालीत विद्यार्थ्यांचे गुण न भरता येणे अशा प्रकारच्या त्रुटी शाळांकडून राहिल्या आहेत.
या त्रुटी आणि चुकांची पडताळणी करून कार्यवाही करण्यासंदर्भात विभागीय मंडळांनाही राज्य मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
