संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित
संयुक्त राष्ट्र संघानं त्यांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेनं रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं. या ठरावावर १९३ सदस्यांनी मतदान केलं यातील ९३ राष्ट्रांनी ठरावाच्या बाजूनं तर २४ देशांनी विरोधांत मतदान केलं. भारतासह ५८ देश या मतदानादम्यान तटस्थ राहिले. रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करायचे की नाही यावर मतदान घेण्यात आलं, त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या दूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याची मागणी केली होती. रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन हा ठराव मांडण्यात आला होता.
