७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कर्तव्य पथावरील पथ संचलनात भारताच्या विराट शक्तीचे झाले दर्शन
नवी दिल्ली, दि. २६: ७५ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना देशवासियांच्या वतीने आदरांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर झालेल्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ प्रमुख पाहुणे म्हणून या सोहोळ्याला उपस्थित होते. समाजाच्या विविध स्तरांतून सुमारे १३ हजार नागरीक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विकसित भारत आणि भारत लोकशाहीची मातृदेवता ही यंदाच्या पथसंचलनाची प्रमुख संकल्पना होती. नारी शक्तीचं दर्शन हे यंदाच्या पथसंचलनाचं वैशिष्ट्य होतं. यंदा प्रथमच तिन्ही सेनादलांच्या तसंच निमलष्करी दलांच्या महिला तुकड्यांनी संचलनात भाग घेतला. तसेच हवाई दलातल्या महिला वैमानिकांनी विमानांच्या दिमाखदार कवायती सादर केल्या. भारतीय पारंपिक वाद्य वाजवणाऱ्या महिला कलाकारांचं पथकही प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील झालं होतं. शंख, नादस्वरम् आणि नगारा अशा वाद्यांचा त्यात समावेश होता. फ्रेंच सेनादलाच्या तुकड्यांबरोबर बहुउद्देशीय रणगाडे, राफेल लढाऊ विमानं, T-90 भीष्म रणगाडा, शस्त्रशोधक रडार यंत्रणा पीनाक, फिरती पूल यंत्रणा स्वाती आणि सर्वत्र, त्याप्रमाणेच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं ही आजच्या संचलनाची आकर्षणं होती.
