रायगड जिल्ह्यात १ मार्च पासून ५८ शिवभोजन केंद्रांमधून तब्बल १ लाख १८ हजार २६७ शिवभोजन थाळ्यांचे झाले वितरण
अलिबाग – राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील अनेक कामगार, मजूर हे रायगड जिल्हयातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग इत्यादी भागात अडकून पडलेले आहेत.
रोजगाराअभावी या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रावरुन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यात १ मार्च पासून एकूण ५८ शिवभोजन केंद्रांवरुन तब्बल १ लाख १८ हजार २६७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण झाले आहे.
जिल्ह्यातील मंजूर शिवभोजन थाळ्यांची संख्या एकूण ११ हजार १५० आहे. दि.१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यात ७ हजार १३१ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दि. १ एप्रिल २०२० ते २४ एप्रिल २०२० या कालावधीत एकूण १ लाख ११ हजार १३६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात ११ हजार १५० मंजूर थाळ्या असल्या तरी लॉकडाऊनच्या या कठीण परस्थितीत जिल्ह्यातील गरजू व्यक्तींची निकड पाहता आतापर्यंत एकूण १ लाख १८ हजार २६७ शिवभोजन थाळ्यांचे वाटप झाले आहे. शासनाने ज्या हेतूने शिवभोजन योजना सुरु केली होती, तो हेतू १०० टक्के सफल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे आणि नागरिकांमधूनही याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
