नवीन कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पुढचं पाऊल – प्रकाश जावडेकर
पणजी, दि.४: संसदेत नव्यानं मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांमुळे एक राष्ट्र-एक बाजार ही संकल्पना अस्तित्वात येणार असून कृषी क्षेत्राच्या परिवर्तनासाठी तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्यादृष्टीनं केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी ही विधेयकं हे पुढलं पाऊल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात पणजी इथं पत्रकारांशी बोलत होते.
कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं सांगतानाच या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होऊन सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी बंद करेल, असा चुकीचा प्रचार विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचं ते म्हणाले. देशातली ६० टक्के जनता शेती करते, मात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त १५ टक्के आहे, शेतमालाचं उत्पादन वाढवण्यासोबतच शेतमालासाठी देशाबाहेरही बाजारपेठ उपलब्ध करून देणं, आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं.
शेतकऱ्याला त्याच्या शेतमालातून उत्पन्न कमी मिळतं, ग्राहकांना मात्र शेतमाल चढ्या दरानं विकत घ्यावा लागतो, याकडे लक्ष वेधत, विरोधी पक्षांचं या कायद्याविरोधातलं आंदोलन हे फक्त दलालांच्या हितासाठी असल्याचं जावडेकर म्हणाले. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या फायद्याचीच असल्याचं म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केंद्र सरकारनं सुरू केली असून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायच्या उद्देशानं केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
