नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरभरती संबंधीची जाहिरात फसवी; दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
नवी मुंबई, दि. १३: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी यांची भरती सुरू असल्यासंबंधी खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. याबाबत काही व्यक्ती/संस्थांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा तसेच महानगरपालिकेचा खोटा स्टॅम्प बनवून त्याचाही वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वास्तविकत: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेची वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
