नमुंमपा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना, येथील रहिवाशी व स्थलांतरीत लोकसंख्या, यामुळे नमुंमपा कार्यक्षेत्र हिवताप /डेंग्यु या आजारासाठी संवेदनशील आहे. नमुंमपा, आरोग्य विभागमार्फत संपुर्ण नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रत्यक्ष सर्वेक्षण, नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण, घरांतर्गत डासउत्पत्ती शोध मोहिमे द्वारे नियमित स्वरुपात हिवताप/डेंग्यु या आजारांचा प्रसार रोखण्याचा प्रभावी पणे उपक्रम राबविण्यात येतो.
सद्यस्थितीत पावसाळा कालावधी सुरु असुन सतत पावसाची ये जा सुरु आहे, त्यामुळे हिवताप / डेंग्यु सारखे रोग पसरविणऱ्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यु सारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे करुन घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते, त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातीत विशेष प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे.
** हिवताप / डेंग्यू आजाराची कारणे –
· हिवताप / डेंग्यु हे किटकजन्य आजार आहेत.
· हिवताप आजार प्रसार संक्रमित ॲनाफिलीस या डासाच्या मादिच्या चावण्यामुळे होतो.
· डेंग्यू आजार विषाणू संक्रमित एडिस एजिप्ताय या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे प्रसार होतो.
** हिवताप / डेंग्यू चा प्रसार –
· हिवताप / डेंग्यु संक्रमित डासाची मादी निरोगी व्यक्तीस चावल्यास हिवताप / डेंग्यू आजाराची लागण व त्याचा प्रसार होतो.
** आजाराची लक्षणे –
* हिवताप :
· थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
· ताप कमी होताना भरपूर घाम येऊन उतरतो.
· ताप सहसा एक दिवसाआड येतो.
· तापाबरोबर डोकेदुखी अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, थकवा जाणवतो.
* डेंग्यू :
· एकाएकी तीव्र ताप येणे.
· तीव्र डोकेदुखी स्नायु दुखी, सांधे दुखी व उलट्या होणे.
· दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी.
· तोंडाला कोरड पडणे.
· ताप कमी जास्त होणे.
· अंगावर पुरळ येणे.
** डासउत्पत्ती स्थाने –
· घरातील व घराबाहेरील झाडांच्या कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी इत्यादी.
· गॅलेरीत/गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री मधील पाणी, बांधकामाच्या ठिकाणी जमा पाणी इत्यादी.
** महानगरपालिके मार्फत नियमित कार्यवाही –
· महानगरपालिकेमार्फत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास/अळी नाशक फवारणी कार्यक्रम.
· साप्ताहिक वेळापत्रकानुसार बंद गटारात रासायनिक धुरिकरण कार्यक्रम.
· घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहिम राबविण्यात येते, त्यामध्ये डासअळ्या आढळल्यास त्या अळ्या नागरिकांना दाखवून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते.
· प्रत्येक हिवताप / डेंग्यु रुग्णाच्या सभोवताळच्या 100 घरांमध्ये डासअळ्या शोधणे, पावडर फवारणी करणे, तापाच्या रुग्णांचा सर्वेक्षण करुन रक्त नमुने घेणे इ. कार्यवाही करण्यात येते.
· आरोग्य कर्मचाऱ्यां मार्फत कार्यक्षेत्रात गृहभेटी देवुन प्रत्येक तापाच्या रुग्णाचा रक्त नमुना घेऊन मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार देण्यात येतो.
· महानगरपालिकेच्या रुग्णालयात किंवा ना प्रा आ केंद्रात येणाऱ्या प्रत्येक तापाचा रुग्णांचा रक्त नमुना घेऊन उपचार देण्यात येतो.
** नमुंमपा ची आकडेवारी –
· सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये हिवताप व डेंगी रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे.
• जानेवारी 2024 – 9325 (घेतलेले रक्तनमुने) / 3 (हिवताप दुषित रूग्ण) / 28 (संशयित डेंग्यू) / 21 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 00 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• फेब्रुवारी 2024 – 11648 (घेतलेले रक्तनमुने) / 0 (हिवताप दुषित रूग्ण) / 18 (संशयित डेंग्यू) / 12 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 02 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• मार्च 2024 – 9973 (घेतलेले रक्तनमुने) / 4 (हिवताप दुषित रूग्ण) / 22 (संशयित डेंग्यू) / 12 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 00 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• एप्रिल 2024 – 9081 (घेतलेले रक्तनमुने) / 8 (हिवताप दुषित रूग्ण) / 13 (संशयित डेंग्यू) / 07 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 01 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• मे 2024 – 7662 (घेतलेले रक्तनमुने) / 3 (हिवताप दुषित रूग्ण) / 23 (संशयित डेंग्यू) / 05 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 00 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• जून 2024 – 12502 (घेतलेले रक्तनमुने) / 2 (हिवताप दुषित रूग्ण) / 67 (संशयित डेंग्यू) / 14 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 01 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• जुलै (05/07/2024 पर्यंत) – 5954 (घेतलेले रक्तनमुने) / 0 (हिवताप दुषित रूग्ण) / 48 (संशयित डेंग्यू) / 00 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 00 (दूषित डेंग्यू रूग्ण)
• जानेवारी ते 5 जुलै 2024 पर्यंत एकूण – 66145 (घेतलेले रक्तनमुने) / 20 (हिवताप दुषित रूग्ण) / 171 (संशयित डेंग्यू) / 71 (एनआयव्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने) / 04 (दूषित डेंग्यू रूग्ण)
** नागरिकांकडून अपेक्षा –
· पाणी साठवून ठेवलेल्या उघड्या ड्रमवर कपडा/ओढणी इत्यादी चा वापर करुन ती झाकूण ठेवणे.
· गॅलेरीत/गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स इत्यादी नष्ट करा.
· फुलदण्या ट्रे, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी आठवड्यातुन एकदा बदला.
· घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याची ड्रम/टाक्या/भांडी आठवडयातुन एकदा काढुन पुर्णपणे कोरडे करा.
· शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छर दाणीचा वापर करा.
· आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये/दवाखान्यांमध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घ्या.
· आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचू देऊ नका.
· ताप आल्यास वैद्यकिय सल्ल्याने उपचार घ्यावा.
नमुंमपा मार्फत हिवताप/डेंग्यु आजार नियंत्रणात आणणेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप /डेंग्यु आजारावर सर्वतोपरी नियंत्रण मिळवणे शक्य नाही. नमुंमपा मार्फत घरांतर्गत डासोत्पती स्थाने तपासणी साठी येणाऱ्या व ताप रुग्णाच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि घरातील सर्व पाण्याचे साठे झाकून ठेवावे असे आवाहन डॉ. कैलास शिंदे, आयुक्त – नवी मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत करण्यात येत आहे.
