मुख्यमंत्री दापोली-मंडणगड चा दौरा करतील का? ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल
दापोली/रत्नागिरी: दोन दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला तडका दिला महाराष्ट्रात मुख्यत्वे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेली गावं अक्षरशः उध्वस्त झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या दापोली व मंडणगड तालुक्यातील किनारपट्टीलगतच्या अनेक गावांत निसर्ग वादळाने मोठी हानी केली आहे. दापोली तालुक्यातील कड्यावरच्या गणपतीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या आंजर्ले गावाचा तर पूर्ण चेहरा-मोहराच पालटून गेला आहे. अनेक घरे कोसळली आहेत तर अनेक वाड्यांमध्ये शिरण्याचे रस्ते झाडांची पडझड झाल्यामुळे पूर्णपणे बंद झाले आहेत.
आंजर्ले, आडे-पाडले, इंगळे, केळशी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, आंबे, केळी, काजू यांच्या बागा असून परवाच्या वादळात अक्षरशः ही झाडं उध्वस्त झाली आहेत. या संदर्भात येथील एक ग्रामस्थ महेश मयेकर यांनी इथली परिस्थिती आमच्याजवळ कथन केली. ते म्हणाले, “परवाच्या ‘निसर्ग’ वादळामुळे अांजर्ले गावाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.त्याची प्रचंड झळ आम्हाला आणि ग्रामस्थांना बसली आहे/ बसणार आहे. गावात भयंकर परस्थिती निर्माण झाली असून सर्वजण आपआपल्या समस्येमध्ये अडकले असूनही इतरांना मदत करत आहेत. गावातील रहिवाशांना दूध, पाणी आणि अन्न बनवणे शक्य होत नाही. घरात अन्न असूनही सर्व भिजले असल्यामुळे किंवा घर कोसळल्यामुळे त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. लोकांना खारे पाणी प्यावे लागत आहे. लहान मुलांना दूध मिळणे अशक्य झाले आहे.वीज प्रवाह कमीत कमी ८/१० येणे शक्य नाही. काल NDRF ची दहाजणाची टीम येऊन दाखल झाली असून त्यांनी १०% रस्ता मोकळा केला आहे.
पुढे येथील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, “प्रत्येक घराचे आणि बागायतीचे प्रचंड नुकसान झाल्याने भांडारवाड्यातून किंवा उभागरातील घरातून समुद्र दर्शन होत आहे. यावरून प्रत्यक्ष नुकसानीची कल्पना येईल. ताडाच्या कोंडावरील रहिवाश्यांनी कड्यावरील गणपतीच्या देवळाचा आसरा घेतला असून तेथे जेवण करत आहेत. अांजर्ले गावातील झालेल्या प्रचंड नुकसानीचे बाहेर कुणालाच कल्पना नसल्यामुळे सरकार पातळीवर शांतता आहे.”
या शिवाय काही ग्रामस्थांचे अशीही तक्रार होती की सरकारचा पूर्ण रोख सध्या रायगड जिल्ह्यावर असून आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जसा अलिबाग चा दौरा केला तसा ते उत्तर रत्नागिरीचा करतील का व तशाच स्वरूपातील मोठी मदत आम्हाला देतील का? असाही सवाल या ग्रामस्थांनी पुढे दकेला.
आंजर्ले गावासारखीच परिस्थिती आडे-पाडले, इंगळे व केळशी या गावांची झाली असून येथेही घरांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इंगळे या गावात तर आता फक्त चार घरे उरली असून बाकी सर्व घरं उध्वस्त झाली आहेत असे आम्हाला कळले. प्रशासनाकडून आंजर्ले व परिसरातील गावांत अद्याप म्हणावी तशी मदत पोहोचली नसल्याचे दिसते. येथील नुकसानीचा आकडा हा मोठा असणार आहे, यावर प्रशासन पंचनामे करताना कोणते निकष वापरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
