नवी मुंबईत फक्त ‘याच’ ठिकाणी असणार लॉकडाऊन व येथील नागरिकांची होणार मास स्क्रिनिंग
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी ५ पेक्षा अधिक कोरोना बाधित व्यक्ती १०० मीटरच्या क्षेत्रात जवळजवळ आढळून येतात अशी क्षेत्रे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून नियमित जाहीर करण्यात येतात. दिनांक २५ जून रोजी अशी ३४ क्षेत्रे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.
या व्यतिरिक्त कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागील १५ दिवसात ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोना बाधित सापडले आहेत अशी कोरोनाचा हॉटस्पॉट असणारी दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर २१ तूर्भे, सेक्टर २२ तुर्भे गाव, सेक्टर ११ जुहू गाव, सेक्टर १२ खैरणे बोनकोडे गाव, सेक्टर १९ कोपरखैरणे गाव, रबाळे गाव, चिंचपाडा ऐरोली अशी १० मोठी क्षेत्र २९ जून ते ५ जुलै २०२० या कालावधीत विशेष प्रतिबंधित क्षेत्र म्हणून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घोषित केली आहेत.
या दहा मोठ्या विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक काम अथवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर येणे-जाणे यावर प्रतिबंध असणार आहे. त्याचप्रमाणे या दहा विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन महानगरपालिकेमार्फत मास स्क्रिनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी व संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे आले आहे.
