मुंबईत पावसाचा जोर ओसरला पण रायगड आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती अद्याप कायम
रायगड/सांगली दि. ७: मुंबईत आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. मात्र काल सलग तीसऱ्या दिवशीही मुंबईत मुसळधार पाऊस झाला. काल संपलेल्या २४ तासांत मुंबईत कुलाबा इथं ३३१ मिली मीटर तर सांताक्रुझ इथं १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे कालही मुंबईतल्या अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं.
काल दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. जलमय झालेल्या अनेक ठिकाणी पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा उपसा करावा लागला. यासाठी गेले ८७ तास पालिकेचे पंप कार्यरत असून, गेल्या चार दिवसात पंपाच्या सहाय्यानं १ हजार ७१४ कोटी लिटर पाण्याचा उपसा केला असल्याची माहिती मुंबई महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे.
आज दिवसभरही मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान शहरात पावसामुळे ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडं, हटवण्याचं काम काल पासून सुरु झालेलं काम आजही सुरु आहे.
रायगड जिल्ह्यात गेले सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती कायम आहे. पुरामुळे आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. सावित्री नदीत बुडत असलेल्या एका व्यक्तीसह त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या मदतीनं वाचवल्याची माहिती पोलादपूरच्या तहसीलदारांनी दिली.
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी कमी झालं असलं, तरी कुंडलिका नदी अजूनही धोक्याच्या खुणेवरून वाहत आहे. जिल्ह्यातल्या इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी पेण इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं एक पथक, तर महाडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचं पथक तैनात केलं. पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचंही वृत्त आहे.
मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक चवदार तळंही तुडुंब भरलं आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात २०९ पूर्णांक ५ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
सांगली जिल्ह्यात वारणा धरण परिसरात गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा धरण ८४ टक्क्याहून अधिक भरलं आहे. धरणातून कालपासून ४ हजार ४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे शिराळा तालुक्यातले चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यातले नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहात आहेत. तर सांगली जवळ कृष्णा नदीची वाढलेली पाणी पातळी आता ३ इंचानं कमी होऊन २३ फूट ७ इंचावर आली आहे. दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सांगली जिल्हा परीषदने कृष्णा नदी पात्रात १५ यांत्रिक बोटी तैनात केल्या आहे. या बोटींचं प्रात्यक्षिक घेतल्यानंतर, त्या नदीकाठच्या गावांना दिल्या जातील.
