उरण मधील वायू विद्युत केंद्र, बोकडविरा येथे विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने
उरण, दि.२८(विठ्ठल ममताबादे): विविध संस्था, संघटनांनी दिनांक २८, २९ मार्च २०२२ रोजी विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यासाठी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांनीही या संपात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंते व कंत्राटी कामगार संघर्ष समितीतर्फे देशव्यापी संपाचा भाग म्हणून वायू विद्युत केंद्र बोकडविरा, तालुका उरण जिल्हा रायगड येथील कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल रविवार दिनांक २७/०३/२०२२ रोजी रात्री १० वाजता वायू विद्युत केंद्राच्या समोर निदर्शने केली.

ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापन यांच्या बरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने सर्व संघटनांनी २८, २९ मार्च हे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वीज उद्योगाचे होणारे खाजगीकरण, केंद्राचे एकतर्फी निर्णय, केंद्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत (संशोधन) बिल २०२१, महाराष्ट्राच्या ६ जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय, तिन्ही कंपन्यात तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण, ३० हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या ६०व्या वर्षीपर्यंत नोकरीचे संरक्षण, रिक्त जागांवर भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण व धोरणात्मक प्रश्नावर हा संप सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती चे प्रतिनिधी श्यामकांत पाटील यांनी दिली. बोकडविरा, तालुका उरण येथील वायू विद्युत केंद्रासमोर निदर्शने करून वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्यात महाराष्ट्र शासनाने मेस्सा (अत्यावश्यक सेवा )कायदा लागू केला आहे. या मेस्सा कायद्या अंतर्गत कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी संपावर जाऊ शकत नाही. तरीही वीज कर्मचारी अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
