महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई मतदारसंघाकरिता द्विवार्षिक निवडणूक – २०२१ कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि.१२: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले ६ सदस्यांपैकी रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यास्तव सदर निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – १६ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – २३ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – २४ नोव्हेंबर २०२१ (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ (शुक्रवार), मतदानाचा दिनांक – १० डिसेंबर २०२१ (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – १४ डिसेंबर २०२१ (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – १६ डिसेंबर २०२१ (गुरूवार).
