मान्य केलेल्या मागण्यांबाबतचा अध्यादेश मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
नवी मुंबई, दि. २६: मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मान्य केलेल्या मागण्यांबाबतचा अध्यादेश मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज नवी मुंबईतील वाशी येथे जाहीर सभेत बोलत होते. ज्या ३७ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याचं शासनानं जाहीर केलं आहे, त्यांची माहिती द्यावी, ज्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्यात त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही शपथपत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मराठा आरक्षणासंदंर्भात नियुक्त केलेल्या शिंदे समितीची मुदत २ महिन्यांसाठी वाढवली आहे, ती वर्षभर वाढवावी, शंभर टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना सर्व क्षेत्रातलं शिक्षण मोफत करावं, सरकारी नोकरभर्तीची प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या जागा राखून ठेवाव्यात, मराठा आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आणि मान्य झालेल्या आमच्या मागण्यांसदर्भातला अध्यादेश काढून त्याची प्रत आम्हाला द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. २६ जानेवारी या दिवसाचा मान राखून आज मराठा आंदोलनकर्ते मुंबईत जाणार नाहीत. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या असून सरकारनेही मान्य केल्या आहेत. मात्र त्याबाबतचा अधिकृत अध्यादेश उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला मिळाला नाही तर आम्ही मुंबईत जाणारच असा इशारा पाटील यांनी दिला.
Photo Credit & Source – Shivraj Mane Photography
Maratha Kranti Morcha Maharashtra Facebook Page
