मालवण तालुक्यातल्या धामापूर तलावाची ‘जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड २०२०’साठी निवड
जगभरातल्या १४ तर भारतातल्या एकंदर ४ तलावांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्रातून एकमेव अशा धामापूर तलावाची निवड झाल्याने या पुरस्काराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
स्यमंतक संस्थेच्या वतीने धामापूर तलावाबतचे तपशील केंद्रीय जल आयोगाला सादर करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियात सिडनी इथे आयसीआयडी च्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज या जागतिक संस्थेकडून ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
जगभरातल्या हेरिटेज तलावांसाठी एकूण १४ पुरस्कार जाहीर झाले असून भारत ४, चीन ४, इराण २, जपान ३ तर कोरियाच्या एका तलावाची निवड झाली आहे.
धामापूर तलाव हे एक रमणीय ठिकाण असून सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून सदर पुरस्कारासाठी केवळ धामापूर तलावाची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
