राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे सुनावणी चालू
मुंबई, दि. १४: राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी सुरु झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुरवातीला युक्तिवाद केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर बोलताना सिब्बल यांनी, अरुणाचल प्रदेशचं उदाहरण दिलं. या प्रकरणात आमदारांनी भ्रष्टाचाराचं पत्र दिलं होतं, यावर काँग्रेसने आक्षेप घेत, हे खोटं असल्याचं सांगितलं होतं. यानंतर काँग्रेसच्या २१ आमदारांचा अपात्रतेची नोटीस बजावली होती, असं त्यांनी सांगितलं. पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही, विधानसभा अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षाला प्राधन्य देतात, असा आरोपही सिब्बल यांनी केला. दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटानं हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी केली असून, त्यावरही न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
Source – AIR
