“३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे” – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई : राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून बाधित पशुधनापैकी एकूण ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. ६ ऑक्टोबर २०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २२३८ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५९ हजार 865 बाधित पशुधनापैकी एकूण ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण ११५.११ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण ११३.१४ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात दि. ६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४२१, अहमदनगर जिल्ह्यातील २५२, धुळे जिल्ह्यात ३५, अकोला जिल्ह्यात ३९३, पुणे जिल्ह्यात १३६, लातूर मध्ये २५, औरंगाबाद ७७, बीड ८, सातारा जिल्ह्यात १८२, बुलडाणा जिल्ह्यात ३६७, अमरावती जिल्ह्यात २९६, उस्मानाबाद ९, कोल्हापूर ११७, सांगली मध्ये २४, यवतमाळ ३, परभणी – २, सोलापूर २८, वाशिम जिल्हयात ३७, नाशिक ८, जालना जिल्ह्यात १५, पालघर २, ठाणे २८, नांदेड २५, नागपूर जिल्ह्यात ६, हिंगोली १, रायगड ७, नंदुरबार २१, वर्धा २ व गोंदिया – १ असे एकूण २ हजार ५२८ पशुधनाचा मृत्यू झाला असल्याचे सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. संबधित रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
