रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने उडवला हाहाकार
मुंबई/रत्नागिरी : कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल पासून मुसळधार पावसानं झोडपलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची ३ पथकं चिपळूण, रत्नागिरी आणि महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर लांज्यात काजळी नदी इशारा पातळीच्या वर वाहते आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नदीचं पाणी इशारा पातळीच्या जवळ पोहोचलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-आंबेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे वैभववाडी रेल्वे स्टेशन जवळचा रेल्वेमार्ग दुपारी पाण्याखाली गेला होता. रायगड जिल्ह्यात गांधारपाले आणि दासगाव या गावांमधल्या काही घरात पाणी शिरल्याचं वृत्त आहे. महाडमध्ये पाण्याची पातळी पाच मीटरपेक्षा जास्त झाली असून महाड शहर आणि परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातल्या रेवतळे गावाजवळ पूलावरुन पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरात राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने बर्की बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बर्गी धबधब्यावर गेलेले ५०-६० पर्यटक बर्की गावातच अडकले असल्याचं कळते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कोणत्याही आपत्तीसाठी तय्यार राहण्याचे निर्देश दिले आहे. अनेक ठिकाणी ‘एनडीआरएफ’ च्या टीम ही तैनात करण्यात आल्या आहेत.
