प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी कोविड लसीकरण शिबिर संपन्न
कोल्हापूर, दि. १५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर व श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाची आज सांगता झाली.
यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वित्त प्रबंधक श्री राहुल पाटील यांच्या हस्ते एक दिवसीय कोविड लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कोविड लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर महानगर पालिका आरोग्य विभाग आणि अमेरिकन सरकारच्या मदतीने टी सी आय फाउंडेशनने हे शिबिर आज आयोजित केले होते. यावेळी डॉ. सोनाक्षी पाटील आणि डॉ निखील पाटील उपस्थित होते.
यावेळी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रदर्शनाला आबालवृद्धांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष सेल्फी बूथवर लहान मोठ्या सर्व नागरिकांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. महात्मा गांधी तसेच छत्रपती श्री शाहू महाराज यांची कटआउट देखील आकर्षणाचा विषय होती. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाद्वारे संवर्धन केलेल्या दुर्मिळ चित्रफिती देखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांनी आवडीने पाहिल्या.
ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी पाहिली. अशाच प्रकारची प्रदर्शने संपूर्ण राज्यात नागपूर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर या शहरात १५ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम शासनाने हाती घेतला होता. यासाठी हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
१७५७ ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, १८५७ लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे छायाचित्र व मजकूर, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ. अॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मॅडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाल, अरविंद घोष, लाला लाजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफअली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना येथे मांडण्यात आल्या होत्या.
चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग आणि खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौरीचौरा, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, स्वातंत्र्यदिन, संस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदी महत्वपूर्ण घटना दुर्मिळ छायाचित्र व मजकुरांच्या माध्यमातून बघता आल्या.
