‘जेएसडब्ल्यू स्टील’ च्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकत नाही का?; ‘हे’ फोटो पाहून झाला रायगडकरांच्या संतापाचा कडेलोट
अलिबाग: सध्या सबंध देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगड जिल्हयातील डोलवी स्थित ‘जेएसडब्लू स्टील’ ला मात्र यातून वगळण्यात आले आहे. येथे हजारोंच्या संख्येने कामगार तीनही शिफ्ट मध्ये काम करतात. यात विशेष परराज्यातून आलेलेही कर्मचारी आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पेण, अलिबाग परिसरातील नागरिकांकडून याच गोष्टीवरून संताप व्यक्त केला जात आहे. येथील नागरिकांचे म्हणणे असे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार या कंपनीत एकत्र येत असतील तर त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन पुढे त्याची लागण या परिसरातील नागरिकांनाही होऊ शकते. आज मितीला अलिबाग-पेण परिसर किमान या विषाणूपासून सुरक्षित आहे.
पण कालपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही फोटोंमुळे तर रायगडकरांच्या रागाचा पारा वरच चढला आहे. यात ‘जेएसडब्लू स्टील’ च्या कर्मचाऱ्यांना कंपनीपर्यंत ने-आण करणाऱ्या बस मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी दाटीवाटीने बसले असून अनेक कर्मचारी उभे असल्याचे दिसत आहे. या सर्वांनी तोंडावर मास्क लावले असले तरी अशा प्रकारे एकमेकांच्या एवढ्या जवळ बसण्याने सोशल डिस्टनसिंग च्या योजनेला हरताळ फासण्याचा प्रकार केलेला दिसतोय. सध्या जर तुम्हाला अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा करावी लागली तरी त्यात फक्त एकाच प्रवाशाला प्रवास करण्याची मुभा आहे इथे तर अखंड बस भरगच्च भरली आहे. देव न जाणो उद्या जर कोणी कोविड-१९ बाधित कर्मचारी यात असेल तर दुसरी इटली ही रायगड जिल्ह्याची होऊ शकते.
या संपूर्ण प्रकरणी रायगड जिल्हाधिकारी काय भूमीकक घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. पण ‘महाराष्ट्र वार्ता’ ने या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ विशेष पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. याबाबत सदर बातमी सहफोटो त्यांच्या कार्यालयाला पाठवण्यात येत आहे. पण प्रश्न अनुत्तरित राहतो की स्थानिक प्रशासनाकडून ‘जेएसडब्लू स्टील’ ला एवढी सूट का देण्यात येत आहे?
