अॅड. निशांत घरत आपल्या मागणीवर ठाम; आमरण उपोषणाचा आजचा १५वा दिवस
उरण, दि. ४(विठ्ठल ममताबादे): ‘जेएनपीटी’च्या कर्मचारी मनीषा जाधव यांचे निलंबन करून त्यांच्या कागदपत्रांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोषणकर्ते निशांत घरत यांनी केला आहे. आज दि ४/४/२०२२ रोजी उपोषणाचा १५ वा दिवस आहे. दिनांक २१/३/२०२२ रोजी हे उपोषण सुरु झाल्याने निशांत घरत यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र प्रशासनाने अजूनही या उपोषणाची पाहिजे तशी दखल न घेतल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केले जात आहे. जेएनपीटी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने अॅड. निशांत घरत यांनी हे पाऊल उचले आहे.
मनीषा जाधव यांचे निलंबन करणे, शासनाच्या नियमानुसार नवीन शेवा गावासाठी ३३ हेक्टर जागेचे वाटप आणि वाढलेल्या कुटुंबांसाठी वाढीव गावठाण साठी शासनाच्या नियमानुसार जागा सुपूर्द करणे, सेझ आणि नवीन येणाऱ्या प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांना प्राधान्याने नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. प्रथम प्राधान्य ज्याच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे त्यांना, द्वितीय प्राधान्य त्या गावातील लोकांना, तृतीय प्राधान्य उरण तालुक्यातील तरुणांना मिळाले पाहिजे या मागण्यांसाठी अॅड. निशांत घरत यांचे उपोषण सुरु आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार अॅड. निशांत घरत यांनी केला आहे. यावेळी उपोषण स्थळी नवीन शेवा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
उपोषणाचा आज दिनांक ४/४/२०२२ रोजी १५वा दिवस आहे. तरीही अजूनही प्रश्न सुटत नसल्याने जेएनपीटी बंदरातील कामगार संघटनांचे नेते जेएनपीटीचे विश्वस्त काॅ. भूषण पाटील, विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते रवी पाटील यांनी योग्य भूमिका घेऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे एल. बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, आम आदमी पार्टीचे संतोष भगत, बीजेपी चे दीपक भोईर, काँगेसचे भालचंद्र म्हात्रे आदी विविध पक्षाचे मान्यवर तसेच उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा उपोषणाला दिला आहे.
