संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि अमेरिका दरम्यान आग्रा येथे १९वी लष्करी सहकार्य बैठक
नवी दिल्ली, दि.२: भारत-अमेरिका लष्करी सहकार्य गटाची (एमसीजी) १९ वी बैठक १ आणि २ मार्च २०२२ रोजी उत्तरप्रदेशात आग्रा येथे संपन्न झाली. भारताकडून चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू द चेअरमन चिफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (सीआयएससी ) प्रमुख एअर मार्शल बी. आर. कृष्णा आणि अमेरिकेच्या यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे डेप्युटी कमांडर लेफ्टनंट जनरल स्टीफन डी. स्केल्न्का यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या चर्चेत दोन्ही देशांदरम्यानच्या विद्यमान संरक्षण संबंधांना बळकटी देण्यावर भर देण्यात आला त्याचप्रमाणे विद्यमान सहकार्य यंत्रणेच्या कक्षेत नवीन उपक्रम राबवण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
भारत-अमेरिका लष्करी सहकार्य गट हा उभय देशातील इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि यूएस इंडो-पॅसिफिक कमांड या मुख्यालयांदरम्यानच्या धोरणात्मक आणि कार्यान्वयन स्तरावरील नियमित चर्चेद्वारे देशांमधील संरक्षण सहकार्याच्या प्रगतीसाठी स्थापन केलेला एक मंच आहे.
