येत्या १२ सप्टेंबरपासून आणखी ८० नव्या विशेष प्रवासी गाड्या सुरु करणार
नवी दिल्ली, दि.६: भारतीय रेल्वे येत्या १२ सप्टेंबरपासून आणखी ८० नव्या विशेष प्रवासी गाड्या सुरु करणार आहे. येत्या १० तारखेपासून या गाड्याचे आरक्षण करता येईल, असे रेल्वेने कळवले आहे. यापूर्वी रेल्वेने २३० गाड्या सुरू केल्या आहेत.
देशाच्या विविध भागातील मागणी आणि प्रतिक्षा यादीवर रेल्वेचे बारकाईने लक्ष असून, गरजेनुसार योग्य वेळी आणखी गाड्या सुरु केल्या जातील, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितले. परीक्षा किंवा इतर कारणांसाठी राज्य सरकारांकडून विशेष विनंती आली तर, आणखी गाड्या सोडल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
१२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गाड्यांमध्ये हैदराबाद – परभणी दैनंदिन विशेष रेल्वे, नाशिक – मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचा आणि सोलापूर मैसूरू गोलगुंबज एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. तसेच देवळाली- मुजफ्फरपूर ही आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष किसान रेल्वे गाडी आता आठवड्यातून तीनदा धावेल. तसंच सांगोला ते मनमाड ही विशेष किसान रेल्वे गाडी सुद्धा आठवड्यातून दोनदा ऐवजी तीनदा धावेल.
