अनेक जिल्ह्यांत नदी किनार्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यातल्या ११ धरणांमधून विसर्ग
नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात नर्मदा किनारच्या भागात गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने व रस्ता वाहुन गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. या भागाची जिल्हाधिकारी आणि सर्व खाते प्रमुखांनी बोटीनं जाऊन पाहणी केली. चिमलखेडीसह परिसरातल्या आदिवासी बांधवांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. तब्बल चार दिवसांनंतर अमरावती-सुरत राष्ट्रीय महामार्गावरची नंदुरबार जिल्ह्यातून जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे. सरपणी नदीला आलेल्या पुराचे पाणी विसरवाडी इथल्या पर्यायी पुलावरुन वाहत असल्याने ही वाहतुक चार दिवसांपासुन बंद करण्यात आली होती.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवरच्या गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना आणि इतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सध्या २१०० क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातल्या कोयना, कृष्णा, वेण्णा नद्यांतील पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असून दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगली शहरासह नदीकडच्या गावांना पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा आणि वारणा नदीवरील १३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संभाव्य पुराचा विचार करून पूर पट्ट्यात राहणाऱ्या सुमारे २ हजार कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. सांगली महापालिका आणि पोलीस यंत्रणे मार्फत, कृष्णा नदी पात्रात होडी चालकांचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं.
