४२ दिवसांची झुंज ठरली निष्फळ
मुंबई/दिल्ली, दि. २१ : हास्य जगतातील प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव ने आज अखेर आपला हास्य प्रयोग अर्ध्यावर सोडत या जगाचा निरोप घेतला आहे. आज बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४२ दिवसांची जीवन आणि मृत्यूची लढाई लढल्यानंतर आज या हास्य कलावंताने या जगाचा निरोप घेतला.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर उद्या म्हणजेच गुरुवारी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजूच्या अकाली निधनामुळे त्याचे चाहते खूप दुःखी आहेत. अनेक वर्षे त्यांनी चाहत्यांना हसवले, गुदगुल्या केल्या आणि काही क्षणांसाठी लोकांचे प्रत्येक दु:ख दूर करण्याचे काम केले.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणाऱ्या विनोदवीराने या जगाचा कायमचा निरोप घेतला.
