दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
मुंबई/पुणे, दि. १ : राज्यात आज दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच विसर्जन होणार आहे. राज्यभर आणि विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरात विसर्जनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून वाहतुकीच्या मार्गातही काही बदल केला आहे. राज्यात महानगरपालिका आणि काही खाजगी संस्थांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहेत. मुंबईत चौपाट्या आणि इतर तलावांच्या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काल गणरायाच्या आगमना बरोबरच राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं जोरदार पुनरागमन झालं. मुंबई ठाणे परिसरात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये काल संध्याकाळी आणि रात्री साडेअकरा ते अडीच वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निरभ्र वातावरण असले तरी या वेळेत ५५.६ मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली, तर मध्यरात्री अडीच ते पहाटे साडे पाच वाजेपर्यंत ११.६ मिमी पावसाची नोंद झाली. अहमदनगर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात काल मुसळधार पाऊस झाला. शिर्डी परिसरात तुफान पाऊस कोसळल्याने शिर्डीच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं. शिर्डीतल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे आसपासच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं.
कनकुरीहुन शिर्डी ला येणारा रस्ता बंद पडला होता. तर नगर ते मनमाड महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु होती. कोल्हापूर शहरासह परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं गणेश आगमन मिरवणुका पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने आज हजेरी लावली. नंदुरबार मध्ये ही काल पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं पेरणी झालेल्या पिकांना लाभ मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या विविध भागात काल सलग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ च्या सुमाराला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली.
